घरातील काही गोष्टी या वापरून झाल्या कि पूर्ण घरसफाई होईस्तोवर तशाच राहतात, कधी कधी काही आठवडे तर कधी काही महिने देखील. आज सकाळी अंघोळ करताना बाथरूम मध्ये काही साबणाचे तुकडे दिसले, आणि मन मग थेट बालपणीच्या काळात गेलं.
लहानपणी माणसापरत वेगळा साबण हि चंगळ नसायची आणि अगदी सर्वजण एकच साबण वापरायचे. त्याकाळी ”Unhygienic” असा काही प्रकार नव्हता आणि त्याबद्दल विशेष काही वाटायचं देखील नाही.
तर हा साबण घास घास घासून संपत आला कि फेकून न देता त्याची रवानगी व्हायची नवीन साबणावर. थोडंसं रगडून त्याला नवीन साबणावर बसवण्यात येई आणि एक दोन अंघोळीत तो त्यात एकजीव होऊन जायचा.
या व अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी अगदी काहीच वापर नसेल तर फेकून देण्यात येत असे.
तसेच महिन्याचं सामान वाण्याकडून आणण्यात येत असे, “10 minute delivery” हा प्रकार त्या काळात कुणाच्या कल्पनेत देखील नव्हता.
सर्व सामान रद्दी पेपर मध्ये बांधून, दोऱ्याने गुंडाळून मिळत असे. तेल वगैरे, घरातनं नेलेल्या भांड्यात घेण्यात येई. मग घरी आल्यावर सर्व सामान वेगवेगळ्या डब्ब्यात, भरणी वगैरे मधून भरले जाई. मग ती रद्दी, ते पेपर लहान मोठे एकावर एक ठेवण्यात येत आणि एका ठिकाणी जपून ठेवण्यात येई. पुढील सामान आल्यावर त्यात आणखी वाढ होई.
तसेच त्यावर गुंडाळलेला दोरा देखील जपून ठेवण्यात येई. मग ती रद्दी रद्दीवाल्याला विकण्यात येई आणि दोरा हार बनविण्यासाठी किंवा काही दुसऱ्या गोष्टीसाठी वापर केल्या जाई.
आजकाल आपण या गोष्टी काही वेगळ्या प्रमाणात “Austerity measures” च्या नावाखाली घडताना पाहतो. मोठमोठ्या कंपन्यात झेरॉक्स, प्रिंट्स घेण्यावर थोड्या फार प्रमाणात प्रतिबंध, पेपर्सचा पुढून मागून उपयोग, इत्यादी…
मला वाटते Austerity आणि काटकसर या दोन वेगवेगळ्या गोष्टी. काटकसर हि लहानपणापासूनच, संस्कारातनं येते तर Austerity हि लादलेली, जबरदस्तीची काटकसर असते. घरावर, कंपनीवर किंवा देशावर अति खर्चाचं ओझं होते, त्यावेळेस मन मारून केलेली काटकसर म्हणजे Austerity , तर तशी वेळच येऊ न देणे हि खरी काटकसर.
खरंच साबणाचे तुकडे बरंच काही सांगून जातात.
Vb

Leave a comment