शाळेत असताना स्कॉलरशिप, नवोदय या स्पर्धात्मक परीक्षेत “समानार्थी शब्द सांगा”, असा एक प्रश्न असायचा. मग एकाच शब्दाचे समान अर्थ असणारे अनेक शब्द पाठ करावे लागायचे. कंटाळा यायचा.
काही काही शब्दांचे तर सात-आठ समानार्थी शब्द असायचे, पाठ करता करता नाकी नऊ यायचे. पण जसं मोठं झालो तसं समानार्थी शब्दांचं महत्व समजू लागलं.
ज्याच्या त्याच्या भाषेत हे समानार्थी शब्द शिकवायची तशी विशेष गरज नसते, पण दुसऱ्या भाषेत लिहिता-बोलतांना याचा विशेष फायदा होतो.
समानार्थी शब्दच आहेत जे एका लेखक किंवा कवीचे सामान्य माणसांपासून वेगळेपण दर्शवतात.
जसं आपण एखादा वाक्य असं म्हणू “तो आला आणि अचानक थांबला” तर तेच वाक्य एखादा लेखक “तो थबकला” एवढ्यात सांगून जातो.
कवींना यमक जुळवण्यासाठी उपयोग होतो तो या “समानार्थी शब्दांचाच”. “जे ना पाहे ‘सूर्य’ ते पाहे कवी” म्हणण्यापेक्षा “जे ना पाहे ‘रवी’ ते पाहे कवी” हे कसं परफेक्ट जुळून येतं.
तसंच वाक्यातील समर्पकपणा, परखडता, सौम्यपणा किंवा विशिष्ट भाव मांडण्यासाठी समानार्थी शब्दच धावून येतात.
आपल्या सर्वांची थोडी फार परिचित भाषा इंग्रजीच घ्या. या भाषेत “why are you talking in loud voice” पेक्षा “why are you shouting / yelling” हे खूप प्रभावी पडतं.
जेव्हा भाषेचा उदय होत होता, तेंव्हा आपल्या पूर्वजांचा गोंधळ उडत असेल, जसं दोघंजण जोरजोऱ्यात हातवारे करून बोलत असतील तर, ते एखाद्या मजेशीर विषयावर देखील बोलत असू शकतील किंवा मारामारी देखील करत असतील, तेंव्हा आवाजातील अरेरावी पाहून “भांडण” हा शब्द अस्तित्वात आला असेल, [हा माझा आपला कयास किंवा अंदाज किंवा तर्क].
नाहीतरी या जगात ज्याला वाचा आहे ते उच्चार तर करणारच, पण बोलण्यातील प्रगल्भता हि ज्याच्या त्याच्या “समानार्थी शब्दातील” वापरावरूनच समजते.
Vb


Leave a comment