
‘आज काल पहिल्यासारखे चित्रपट नाहीत, गाणी नाहीत किंवा चांगले टीव्हीवरील कार्यक्रम देखील नाहीत’, या गोष्टी येता जाता कानावर पडत राहतात.
पण खरंच जेव्हा आपण आपला बालपणीचा काळ किंवा त्या वेळेसच्या गोष्टींची तुलना करू, तेव्हा “ओल्ड इज गोल्ड” हेच बरोबर वाटते.
टीव्हीवरील मालिका तर सर्व एकाच धाटणीच्या झाल्यात. तीच सासू-सून, लफडे, झगडे, वगैरे वगैरे.
आणि विनोदी कार्यक्रम म्हणजे अगदी नकोसे झालेत. तेच तेच पांचट विनोद, दर्शक किंवा जजेस यांचा नको त्या गोष्टींवर खिदळणं.
त्यापेक्षा शांत बसावसं वाटतं .
याला एक सुखद अपवाद म्हणजे सोनी मराठीवरील “महाराष्ट्राची हास्यजत्रा ”.
हा विनोदाचा कार्यक्रम म्हणजे अगदी मराठीपणाच्या आणि निखळ हसवणुकीद्वारे करमणुकीच्या अगदी सर्व चौकटी टिक मार्क करतो.
“निखळ विनोद” केवळ या आणि याच प्रकारात मोडणारा, तसेच या कार्यक्रमाच्या टॅग लाईननुसार “सहकुटुंब हसू या” याचा प्रत्यय देणारा आणि बऱ्याच काळानंतर आलेला हा एकमेव कार्यक्रम आहे.
जवळपास सर्वच कलाकार, हे अभिनयाची कुठलीच पार्श्वभूमी नसणारे आहेत, किंवा त्यांचा कुणी गॉडफादर वगैरे आहे असे वाटत नाही.
अँकर पासून ते जजेस पर्यंत, सर्वजण अगदी तावून सुलाखून, खस्थे खात इथपर्यंत पोहोचले आहेत.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, हि सर्व कलाकार मंडळी हि मध्यमवर्ग [middle class] ते लोअर मिडल क्लासमधनं आलेली आहेत.
त्यांचे नेहमीचेच इशूज, तक्रारी, नवरा बायकोतील भांडणं, मुलांचे भलते उद्योग, प्रेमी युगुल, बिल्डिंग मधील भांडणं आणि विशेष म्हणजे त्यांची ‘इंग्रजी’ व आणखी बरेच काही. त्यामुळे त्यांच्यासोबत एक विशिष्ट प्रकारची नाळ जुळलेली आहे असे वाटते.
सर्व एपिसोड्स पाहताना आपणच जणू स्वतःला त्या पात्रात बघतो आहोत अशी प्रचिती येते.
सुरुवातीची ओपनिंग प्राजक्ता माळीची – कुठल्यातरी छान वाक्याची जुळवाजुळव करून, त्यात नकळत “तुमच्या टेन्शनवरची मात्रा दूर करायला घेऊन येतायत …” हि ओळ.
त्यानंतर विविध कलाकारांना समर्पकपणे लागलेली बिरुदे – जसं हास्य सम्राट समीर चौगुले, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, भांडुपचा शशी कपुर बने, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात आणि बरेच काही.
यासोबतच दोन जजेस साठीचे ‘बोल्ड बिनधास्त आणि ब्युटीफुल सई ताम्हणकर’, ‘खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक’.
अगदी सर्वच्या सर्व पात्रे काहीतरी विशेष ओळख असलेले.
निखळ विनोद, रोजच्या जीवनातील अडचणी, तक्रारी अगदी समर्पकपणे मांडून, कुठेच रटाळ न वाटणारी कॉमेडी हे या जत्रेचे विशेष.
प्राजक्ताची सुरुवात, कलाकारांची अंदाधुंद कलाकारी, धमाल अभिनय आणि तेवढ्याच समर्पकपणे जजेस ने दिलेला अभिप्राय.
या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हि दोन जजेस. आज कालच्या रटाळ वाटणाऱ्या रिऍलिटी शो-मध्ये उगाच TRP वाढविण्यासाठी कुठल्याही पातळीला जायची तयारी असणाऱ्या जजेस ने सई आणि प्रसाद यांच्याकडून खरंच शिकण्यासारखे आहे.
आतापर्यंत बघितलेल्या एकाही शो मध्ये, कुणाचा अनादर किंवा डिमोटिवेट करणारा फीडबॅक कधीच नाही. नेहमी अगदी प्रोत्साहन देणारा, छोट्या छोट्या जागा कशा चांगल्या प्रकारे वठवल्या त्याबद्दल भरभरून स्तुती सुमने उधळणारा अभिप्राय.
फक्त कलाकारच नाही तर, वाद्यवृंद, तसेच बॅकस्टेज आर्टिस्ट यांनाही वेळोवेळी प्रोत्साहन दिल्या जाते.
सर्वच्या सर्व एपिसोड्स अस्सल करमणूक करणारे, कधी कधी या विनोदांना, कारुण्यतेची एक हलकीशी झालर दिल्या जाते, पण त्या थोड्या वेळेपुरतीच आणि मग परत मुख्य प्रवाहात.
विशेष कौतुक म्हणजे सचिन मोटे, सचिन गोस्वामी यांचे. काही एपिसोड मध्ये अगदी त्यांच्यावर देखील विनोद होतात, अगदी ते या कार्यक्रमाचे दिग्दर्शक, निर्माते असून देखील [जसं पांढऱ्या केसांचा राजकुमार इ.], पण ते देखील हे सर्व खिलाडू वृत्तीने स्वीकारतात.
सर्व कलाकार आपापल्या जागी आपले अढळ स्थान निर्माण केलेले, बाकी ठिकाणी बघायला मिळणारी स्पर्धा अजून तरी त्यांच्यात दिसत नाही.
यात प्रेम आहे पण उगाच चावटपणाचा आव नाही, एकमेकांना आलिंगन देताना कसलाच धसमुसळेपणा नाही, थोडा आंबट विनोद असतो पण फक्त चवीपुरता.
“शालीनता सांभाळून विनोद करता येतो” हे दाखवणारा हा सहकुटुंब बघण्यासारखा कार्यक्रम आहे.
एकंदर “महाराष्ट्राची हास्यजत्रा” म्हणजे पैकीच्या पैकी मार्क्स घेणारा करमणूक क्षेत्रातील एकमेव विद्यार्थी आहे.
चला तर मग…

Leave a comment