चाळीशी गाठली म्हणजे स्वतः खूप उन्हाळे कि पावसाळे पाहिल्यासारखे वाटून आपण (इथे मी) लगेच सल्ले उपदेश द्यायला लागतो.
आजचीच गोष्ट. कोरोना संपल्यावर बऱ्याच महिन्यांनी आता आमचंही ऑफिस सुरु झालंय. आणि आज तर मार्केट व्हिझिट होती.
नुकताच जॉईन झालेल्या एका तिशीतील सेल्समन सोबत जायचं होतं आणि निघालो. तो तामिळ आणि मी मराठी. कॅबमध्ये बसून मग जसं जमेल तसं आम्ही तोडक्या मोडक्या इंग्रजीमध्ये गप्पा सुरु केल्या.
सर्व प्राथमिक गप्पा जशा – घरी कोण कोण असते, बायका मुलं इथे असतात कि गावी, आई वडील कुठे असतात, मुलं किती वगैरे वगैरे. मग विचारला चेन्नईत कुठे राहतोस आणि घर भाड्याचं कि स्वतःचं?
तो म्हणाला, सर घर भाड्याचं आहे, (माझ्यातला उपदेशकर्ता जागा झाला) मी म्हणालो, अरे प्रयत्न करून घर घ्यायचा प्रयत्न कर, आता घर झालं तर पुढे गोष्टी सोप्या होतात. तो म्हणाला, सर घराचा हप्ता आणि गाडीचा हप्ता नाही झेपणार.
मी म्हणालो (गाढवा – हे मनातल्या मनात), घर घ्यायच्या आधी गाडीची गडबड का? ती पण एकदम भारीची गाडी, त्या पैशात चेन्नई सारख्या ठिकाणी एक चांगला वन BHK चे डाउन पेमेंट झाले असते.
आता मला चांगलाच मुद्दा मिळाला. माझं मग सुरु – गाडी घेऊन चूक केलीस, आधी घर घ्यायचं, हळू हळू काही वर्षांनी गाडी, वगैरे वगैरे. त्याने शांतपणे ऐकलं आणि मग तो बोलू लागला.
गावी जेमतेम ४-५ एकर जमीन आहे, पूर्ण घर शेतीवर अवलंबून. दोन बहिणी आणि तो. मधल्या काळात सततच्या दुष्काळाने अक्षरशः रेशनच्या तांदळावर दिवस ढकलावे लागले. आई वडिलांनी खूप खूप मेहनत केली. आता जवळपास ठीक आहे, आणि बहिणींची लग्नं झाली आहेत. जसं समजते तसं आई वडील कधीच गावाच्या बाहेर कुठे गेलेले आठवत नाहीत, म्हणून घेतली गाडी, त्यांना थोडा फार कुठेतरी फिरवून आणायला. जेव्हा जेव्हा गाडी घेऊन गावी जातो, तेव्हा माझे वडील एकटेच समोरच्या सीटवर बसून असतात, एक वेगळं सुख असते त्यांच्या चेहऱ्यावर. कधी कधी तर ते तिथेच एखादी झोपही काढतात.
झालं, शेवटच्या वाक्यावर मी मनातल्या मनात थबकलोच. माझ्यातला आर्थिक सल्लागार पुरता हरला. माणसं जे काही निर्णय घेतात, ते बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतात. आपण मात्र त्याला एकाच दृष्टिकोनातून बघत असतो आणि काहीतरी सांगत बसतो.
जीवनात सगळं काही क्रमाने होणं हे चांगलंच, पण आपल्यांच्या सुखासाठी तो क्रम मोडावा लागत असेल तर त्यात काही गैर नाही.
ठरवलं, आजपासून फुकटचे सल्ले बंद.
Vb


Leave a comment