पुढचं पकडायच्या या धडपडीत आपण अनेकदा क्रम विसरून जातो, दुर्लक्ष करतो आणि मग बरंच काही विस्कटत जाते.

मुलाचा अभ्यास घेत होतो…नाही नाही, नेहमी घेत नाही, बायको गणपती गौरीसाठी गावी गेलीय आणि मुलाची परीक्षा सुरु आहे, मग पर्याय नाही.
तर तो काहीतरी पाठ करून आला आणि मला पुस्तक देत म्हणाला, पप्पा अभ्यास घ्या.
मग मी सुरु केलं, तो उत्तर देताना मी एक निरीक्षण केलं, जे मी देखील माझी आई अभ्यास घेताना करत होतो, जसं एखाद्या उत्तरात ५-७ मुद्दे असतील तर एकदम आधी शेवटचा मुद्दा सांगायचा आणि मग परत पहिला दुसरा तिसरा असं.
माझा मुलगा देखील तेच करत होता, आता यामागे त्याचा उद्देश काय हे मला माहित नाही, पण मला असं वाटायचं कि मी जर पहिल्या मुद्द्यापासून सुरु केलं तर मागचे मुद्दे विसरून जाईल.
म्हणून आधी सर्वात शेवटचा मुद्दा हातात धरून ठेवायचा.
असं करता करता, शेवटचा मुद्दा लक्षात राहायचा, मग पहिले २-३ मुद्देही यायचे पण चौथा पाचवा मुद्दा कधीतरी निसटून जायचा. असं हे बऱ्याचदा व्हायचं. का माहित नाही.
मग जेव्हा शाळा / कॉलेज सोडून दुनियादारी पाठी लागली तेव्हाही परिस्थिती हीच होती.
नेहमी खूप पुढच्या गोष्टी आटोक्यात आणायच्या प्रयत्नात असायचो. मोठं काहीतरी, छोट्या गोष्टीपासून काही करून किंवा मोठ्या गोष्टींसाठीचा धीर कधीच झाला नाही.
जे दूरचे आहे त्याला पकडायचं या धावपळीत, ते दूरचे ध्येय हाती येते पण मग जी जवळची ध्येयं त्या त्या वेळी आवश्यक असतात ती त्या चवथ्या पाचव्या मुद्द्यासारख्या सुटू पाहतात.
प्रोमोशन पाहिजे, लगेच १-२ वर्षात, घर घ्यायचं, गाडी घ्यायची, खूप मेहनत करायची.

जॉब सांभाळणं हा पहिला मुद्दा, प्रोमोशन मिळवणे, घर, गाडी घेणे हे शेवटचे मुद्दे आणि मग, खाणं-पिणं, तब्येतीची काळजी, नातेसंबंध हे त्यातील चौथे पाचवे असलेले मुद्दे लक्षात राहत नाहीत.
मग आयुष्याच्या पेपरमधील खऱ्या सुखा समाधानाचा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
पुढचं पकडायच्या या धडपडीत आपण अनेकदा क्रम विसरून जातो, दुर्लक्ष करतो आणि मग वर सांगितल्याप्रमाणे बरंच काही विस्कटत जाते.
इथे दिलेले हे उदाहरण आपल्या आयुष्याला एकदम समर्पकपणे लागू नाही पडत, पण आपण सर्वजण काही प्रमाणात हि चूक करत असतोच.
बघू या, यापुढे सर्व मुद्दे क्रमाने लक्षात ठेवून आयुष्याचा प्रश्न सोडवता येतो का?

Leave a comment