
सुखदा : बॉबी, स्टार्टर्स मध्ये काय घेशील तू?
[बॉबी अर्थात बबन, मेनू कार्डच्या उजव्या साईडच्या किमतीकडे बघत, मनातल्या मनात, आजच्या जेवणाचे अंदाजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती पैसे होतील या विवंचनेत]
बॉबी [बबन] : स्टार्टर्स…मला तर डायरेक्ट मेन कोर्स घ्यावा वाटतो, स्टार्टर्स घेतल्यावर जेवण अर्धवट राहिल्यासारखं वाटते
सुखदा : म्हणजे स्टार्टर्स मध्ये तुला काहीच नको
[आता मला काहीच नको म्हणजे, हि नक्कीच काहीतरी मागवेल, हे बबनला कळले होते, पण तरीही तो ठाम होता, काहीच नको म्हणून]
बॉबी : खरंच नको, मी करिन थोडंसं तुझ्यातले शेअर
सुखदा : मग मेनू कार्ड चाळत, मेन कोर्स बद्दल विचारत होती
बॉबी : मेन कोर्स मध्ये मला काहीही चालेल [त्याला भूक लागली होती, आणि थोडंफार गणित करून त्याने स्वतःच्या मनाला होणाऱ्या खर्चाबद्दल समज घातली होती]
असं काही नव्हतं कि तो आता हे असे खर्च पेलू नाही शकत, पण मध्यमवर्गीय काटकसरीची एकदा सवय लागली कि “अनावश्यक ते काही नको” हे अगदी अंगवळणी पडते.
सुखदा : मी स्टार्टर्स मध्ये पनीर चिल्ली आणि स्वीट कॉर्न सूप मागवते आणि मेन कोर्स मध्ये माझ्यासाठी सीझलर्स आणि नंतर थोडासा राईस मागवेन, [मेनू कार्ड बॉबी कडे देत ] तू तुझं सांग
बॉबी : [सीझलर्स शेअर नाही करता येणार आणि स्टार्टर्स वगैरे खाऊन परत राईस मागवणारच, हे ऐकल्यावर त्याची भूकच मेली , मग थोडं फार सावरण्याचा प्रयत्न करत ] अगं सिझलर्स काय मागवतेस, हे बघ आपण एक व्हेज कोल्हापुरी [मराठी माणसाची नेहमी ठरलेली डिश ], एक दाल तडका, बटर रोटी आणि मग तुझं फेवरेट जीरा राईस घेऊयात .
पोट भरेल [आणि मनातल्या मनात खर्च कमी होऊन अन्नाचा नासाडी होणार नाही ]
सुखदा , हि एक चांगल्या सधन कुटुंबातील होती , हॉटेल मधल्या अशा गणिताची तिला कधीच सवय नव्हती , नेहमी मेनू कार्डच्या उजव्या [किमतीकडे ] न बघता ती ऑर्डर द्यायची.
बबन आणि सुखदा पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होते , बबन आणि ती एका विशिष्ट प्रोजेक्टसाठी एकत्र आलेली असतात आणि त्यामुळे हि मैत्री [पुढे काही शक्य होईल का या अनुत्तरित प्रश्नाचे उत्तर सापडण्यात गुंतलेली ]
ते बऱ्याच दिवसांनी , ऑफिस कॅन्टीन सोडून , आज काहीतरी वेगळं ट्राय करू म्हणून या रेस्टॉरंटमध्ये आलेले . रेस्टोरंटच्या बाहेरचा दरबान, वैटर्सना युनिफॉर्म, आत गेल्या गेल्या AC ची थंड हवा , ह्या सगळ्या गोष्टी बघत , बॉबी /बबन व्हेज कोल्हापुरी पर प्लेट २८० रुपये कि ७९९ रुपये फक्त यातच गुंतलेला होता.
जेवण झाल्यावर काहीतरी स्वीटचा विषय निघाल्यावर बॉबीने एकदम आवरतं घेत, काहीतरी बाहेरच बघू या असे म्हणत बाहेर काढलं. ऑफिस जवळ आले तरी बॉबी काही स्वीट घेत नाही हे पाहिल्यावर सुखदानेच तेथील टपरीवरून दोन कॅडबरी घेतल्या.
तिच्या हातात ती कॅडबरी बघून, त्याला त्याच्या बालपणीची “10 रुपयाची कॅडबरी ” आठवण झाली.
मनाचा एक कप्पा अलगद उघडल्या गेला.
बबनच्या लहानपणी एकदमच हलाकीची अशी काही परिस्थिती नव्हती , तरीपण बऱ्याच गोष्टी अगदी जेमतेमच होत्या . शाळेचा गणवेश – एकंच , दिवाळीला नवीन कपडे – एकदाच वर्षातनं , घरात गोडधोड , फक्त कुणी विशेष पाहून आलाच तर , फक्त शिक्षणाबाबत कुठलाच आखडता हात नव्हता .
बाबा जिल्हा परिषदेच्या बाहेर टाईप रायटर घेऊन जे थोडेफार मिळायचे , त्यात ते दिवस ढकलायचे.
बबनला किंवा त्याच्या लहान बहिणीला गीताला पैसे असे नाही मिळायचे . पण कधी कुठली मावशी, काका , आजी आजोबा आले कि १० -२० रुपये हातात पडायचे तेवढेच . पण ते देखील आई काढून घ्यायची , “मुलांना पैसे काय करायचे ” हे सांगत .
शेवटी त्या पैशातील २ रुपये , ४ रुपये यावर मांडवली व्हायची. बबन्या लगेच दुकानात पळायचा तर गीता गल्ल्यात जमा करायची .
तर हि आठवी /नववीची गोष्ट होती , वर्गात सिंधू नावाची एक नवीन मुलगी आली होती , वडिलांची अचानक बदली झाल्याने , जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय पर्याय नव्हता.
पहिल्या दिवशी आल्या आल्या , तिला बघून बबन्या तसंच अक्खा वर्ग काहीतरी नवीन पाहतोय असाच झाला . सिंधू म्हणजे बॉय कट केलेली, चेहऱ्यावर एक वेगळाच कॉन्फिडन्स असलेली आणि थोडीशी स्वैर अशीच दिसत होती.
मुलींनी मुलांना बोलणे हे अगदी निषिद्ध असलेल्या तालुक्यातील मराठी शाळेत सिंधूचे मुलांना वैगैरे बोलणं हे म्हणजे अगदी डोक्यावरून पाणी होतं. ती कधी मुलांना काही विचारत असल्यावर मुलांची हालत एक्दम वेगळीच व्हायची . पण हळूहळू वर्गाला तिची सवय झाली.
बबन्या त्यातल्या त्यात थोडा हुशार आणि गणितात म्हणजे एकदम राजा. सिंधूच आणि त्याचं खूप वेळा बोलणं व्हायचं. तशी सिंधू बाकीच्या मुलांसोबतही बोलत असे.
काय माहित पण बबन्या सिंधूला बोलताना गुंतत जात होता, प्रेम वगैरे असं काही त्या काळात अकल्पनीय होतं, पण त्याला तिचं ते विचारणं आवडायचं, तोही मग सर्वच विषयांचा चांगला अभ्यास करायचा .
त्याला आता एक दिवसही शाळेला सुट्टी म्हणजे अवघडल्यासारखं व्हायचं , रविवार अगदी नकोसा व्हायचा .
नववी संपली , दहावी संपत आली आणि दहावीही संपली . सिंधूच्या बाबांची परत बदली होणार असे समजले , आणि बबन्याचा आयुष्यात एक नवीन घालमेल सुरु झाली . प्रेम-बिम असं काही नव्हतंच मुळी पण तरीपण त्याला उगाच अवघडल्यासारखं होऊ लागलं.
बोलताही येईना आणि काही करताही येईना. अशातच शाळेने दहावीच्या मुलांना सेंड –ऑफ द्यायचं ठरविले आणि एक तारीख पक्की झाली .
बबन्याने मग ठरवलं कि सिंधूला काहीतरी भेट द्यायची. पण पैसे , पैशांचा मोठा प्रश्न होता.
मग त्याने स्वतःजवळचे ३ -४ रुपये आणि बाकीचे गीतीजवळून शाळेतलं काम आहे म्हणून घेतले आणि आईला सांगू नकोस म्हणून सांगितलं .
त्या १० रुपयात त्याला फक्त कॅडबरीचं चॉकलेटचं मिळत होतं जे भेट म्हणून देखील देता येऊ शकत होतं.
त्याने ठरवले , १० रुपयाची कॅडबरी घ्यायची आणि सिंधूला द्यायची . मग सेंड ऑफ च्या दिवशी दुकानात गेल्यावर त्याने दुकानदाराला १० रुपये दिले आणि चॉकलेट घेतले , तेवढ्यात राहुल्या [राहुल – वर्गातील एक सैराट मुलगा टपकला], आणि बबन्याच्या हातात कॅडबरी बघून त्याने डायरेक्ट विषयालाच हात घातला .
राहुल्या : बबन्या कोणाला द्यायला चॉकलेट घ्यायला ?
बबन्या एक्दम रंगे हाथ पकडल्या गेलेल्या चोरासारखं कावरा बावरा झाला . त्याला काय उत्तर द्यावे हे काहीच समजत नव्हतं. दोन गाडीच्या मध्ये सापडलेल्या कुत्र्यासारखी हालत झालेली .
बबन : [धीर करून बोलला ], माझ्यासाठीच घेतलं आहे ,
राहुल : खोटं बोलू नकोस , बबन्या
बबन : खोटं काय आहे , मलाच खायचं आहे
राहुल : खाय ना मग , आत्ताच खाय
बबन : [टेन्शनमध्ये येऊन , आता काय बोलावं ह्या विचारात , आणि शेवटी त्याला सुचलं] आता नाही घरी जाऊन मी आणि गीती खाणार आहोत
राहुल : बबन्या एवढी भारीची चॉकोलेट कुठलंच पोरगं स्वतःसाठी घेत नाही
“बबन्या एवढी भारीची चॉकोलेट कुठलंच पोरगं स्वतःसाठी घेत नाही ”, या वाक्याने एकदम अचूक नेम धरला होता.
बबन्याने पैसे दिले आणि तो तडक घरी गेला . संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी , सगळे पोरं पोरी जसं जमल तसं चांगला दिसण्याचा प्रयत्न करून शाळेत दाखल झाले .
बबन्यापण मागच्या दिवाळीचा ड्रेस घालून , कॅडबरी पॅन्टच्या खिशात ठेवून हजर.
अल्पोपाहाराचा कार्यक्रम संपल्यावर घरी जायच्याआधी सिंधूच्या हातात चॉकोलेट द्यायचं आणि पळून जायचं हे पक्कं ठरवलं होतं.
मुख्याध्यापक आणि काही शिक्षकांची भाषणं झाली . मुलांतर्फे कुणी इच्छुक असेल तर बोलावं असे आवाहन केल्यावर एकटी सिंधूच तयार झाली .
तिने बोलताना सर्व शिक्षकांसोबतच वर्गातील मुले आणि बबन यांची कशी मदत झाली आणि त्याबद्दल धन्यवाद दिले .
मग अल्पोपहार करताना , सिंधू , बबन , तसेच वर्गातील मुलं एकमेकांना बोलत होती , या दोन वर्षात सिंधूचा परिणाम म्हणा, बाकीच्या मुलीदेखील सावरून सावरून मुलांना बोलू लागल्या . आता रोजच्या सारखी भेट होणार नाही याची रुखरुख सगळ्यांच्याच मनात होती .
बबन्या योग्य वेळ शोधत होता, पण राहुल्याची बेरकी नजर बबन्यावर सारखी होती , बबन्या त्याच्याशी थोडं चोरून चोरूनच वागत होता.
शेवटी बबन आणि सिंधू बोलू लागले , कुठल्या गावी जाणार , आर्टस् घेणार कि सायन्स घेणार अशा औपचारिक गोष्टीनंतर [ज्यात बबन्याला बिलकुल इंटरेस्ट नव्हता] बबन्याचा हात हळूच खिशाकडे गेला . गुळगुळीत कॅडबरी हाताला लागत होती पण ती बाहेर काढून द्यायची हिम्मत होत नव्हती .
शेवटी ती निघाली , तो तिथेच थांबून होता , हात खिशात तसाच होता . तो कुणी तरी स्टॅचू म्हणल्यावर जसं स्तब्ध होतं असे , तसाच थांबून होता .
घरी आला , रात्री झोपताना त्याने ती कॅडबरी गुपचूपपणे दप्तरात ठेवून दिली .
एक दोन महिन्याने रिझल्ट लागला , बाबांनी चांगले मार्क पाहून आणि शिक्षकांच्या आग्रहास्तव बबन्याला जिल्ह्याच्या कॉलेज मध्ये टाकण्याचा निर्णय घेतला.
जायच्या दिवशी , गीती म्हणाली , दादा तुव दप्तर मी घेते आता आणि असं म्हणत , त्याची पुस्तकं वह्या काढू लागली , अन तिच्या हाताला ते वितळून पार चिखल झालेलं कॅडबरी चॉकलेट लागलं.
ते बघताच , बबन्या एक्दम बावरला , काही कळायच्या आतच गीती आई आई म्हणून ओरडू लागली , दादा एकटाच भारीचं चॉकलेट खातोय म्हणून ओरडू लागली , आई आली , काय रे बबन्या , एव्हढं मोठा झालं तरी बहिणीला सोडून कसं खातुस रे , आणि हे कुठलं चॉकलेट , एव्हढ्या महागाचे.
बबन्या शांतच होता , तो विषय त्याच्यासाठी केव्हाचाच संपला होता .

Leave a comment