
शंकरराव विधानसभेत दाखल झाले. आल्या आल्या त्यांनी गाडीतूनच स्वतःचा सेल्फी काढला आणि व्हाट्सअँप ला डीपी लावून टाकला. निवडणुकांचं वारं सुरु झाल्यापासून शंकररावांनी हे नवीनच सुरु केलं होतं. जिथे जाईल तिथला डीपी लावून टाकायचा. कधी कधी तर दिवसातून ३-४ डीपी लागायचे.
कधी जिल्हा परिषदेचा तर कधी पंचायत ऑफिस मधला, काहीच नाही तर प्रचारादरम्यान या तालुक्यातून त्या तालुक्यात जाणारा गूगल मॅप टाकून द्यायचे.
निवडणुकीच्या काळात वेळ महत्वाची असते आणि पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून आपण पक्षश्रेष्ठी आणि कार्यकर्त्यांना कळणं आवश्यक असते हे त्यांचं म्हणणं असे.
तर शंकरराव गाडीतून उतरल्या उतरल्या पत्रकार आणि कार्यकर्त्यांचा गराडा त्यांच्या भोवती जमला. शंकरराव दोन्ही हात उंचावून, कधी कधी एक हात वरती करून सर्वजणांना नमस्कार करत होते.
शंकरराव काय म्हणतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा कशी ठरवतील याकडे सर्वजणांचे लक्ष लागून राहिले होते.
हळूहळू पोलिसांच्या मदतीने शंकरराव तो माणसांचा गराडा बाजूला सारत मंत्रालयातील एका मोठ्या सभागृहात दाखल झाले. तिथे मंचावर पक्षातील मोठी मंडळी आणि प्रतिष्ठित व्यक्ती आधीच विराजमान होत्या. शंकरराव आल्याचं पाहून सर्वजण उठून उभे झाले.
“ताट-वाटी” या चिन्हावर स्वतः आणि कार्यकर्त्यांना निवडून आणल्याबद्दल सर्वांच्याच मनात शंकररावांबद्दल एक अभिमान होतं.
स्टेजवर हार, शाल श्रीफळाचे सोपस्कार उरकले आणि शंकरराव बोलण्यास उभे राहिले.
शंकरराव :- सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला वंदन करतो आणि “ताट-वाटी”ला भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल माझ्या माता भगिनी आणि बंधू जणांचे आभार व्यक्त करतो.
यावर सभागृहातून नारे लागतात – घराघरात तूप रोटी, निवडून आली ताट-वाटी, अरे मुख्यमंत्री कैसा हो, शंकरराव जैसा हो, एकच नाद, शंकर नाद.
शंकररावांनी त्यांच्या उत्साहाला १-२ मिनिटे दिली, स्टेजवरील मान्यवरांकडे एक कटाक्ष टाकला आणि हात उंचावून त्यांना शांत केलं.
मी स्वतःला कधीच पक्षापेक्षा मोठं मानलं नाही, मी सदैव स्वतःला पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मानत आलेलो आहे आणि एक कार्यकर्ता म्हणूनच पक्ष आणि जनतेचा सेवक राहील. या ऐतिहासिक विजयात माझा अगदीच खारीचा वाटा आहे. जनतेची आणि तुम्हा सर्व कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर मी मंत्रिपद किंवा मुख्यमंत्रीपद स्वीकारून जनतेची सेवा करण्यास तयार आहे. असे म्हणताच कार्यकर्ते परत जल्लोषात. परत त्यांना शांत करण्यासाठी त्यांनी दोन्ही हात उचलले.
कोंडीबा (शंकऱ्याचा बाप) बऱ्याच वेळापासून हे सर्व हातवारे बाजूला चहा पीत बघत होता. शेवटी ना राहून त्याने बाजेवर झोपलेल्या शंकऱ्याला एक लाथ घातली. शंकऱ्या पार कोलमडून पडला. गालावरची लाळ पुसत आणि कंबरेवर एका हाताने चोळत डोळे उघडले तर दिस उजाडून गेला होता.
शांती (शंकऱ्याची बायको) सुडक्यात भाकरी बांधून त्याच्या हातात देत म्हणाली, “रातच्याला जळतन आणलं नाही तर रातच्याला भाकर न्हाई”.
शंकऱ्याने भाकरी घेतल्या आणि ढोरांना सोडता सोडता “म्हसाईच्या माळावरचं गायरान” असा डीपी टाकला अन चालू लागला.

Leave a comment