छत्रपती शिवाजी महाराजांवरचं एक पुस्तक वाचत होतो. औरंगजेबाच्या हाती तुरी देऊन महाराज आणि शंभूराजे बाकी मावळ्यांसकट निघाले होते. वेळ जोखमीची होती आणि महाराज आणि शंभूराजे, यांनी एकत्र राहणे, संशयास निमंत्रण देण्यासारखे होते. म्हणून महाराजांनी मनाशी एक निर्णय घेतला, असा निर्णय जो स्वराज्यासाठी अति महत्वाचा पण एका बापासाठी मरणापेक्षा अधिक जीवघेणा.
महाराज : शंभूराजे, आपण दोघांनी एकत्र स्वराज्यात परतणे धोक्याचे आहे, म्हणून तुम्हाला आणि आम्हांस वेगवेगळा प्रवास करणे आहे.
हे ऐकून मावळ्यांच्या काळजात चर्रर्रर्र झालं.
हे वाचताना मनात काहीतरी चिरत चालल्यासारखं झालं होतं. कारण ते पुस्तक एक बाप वाचत होता.
काय झालं असेल त्यांच्या मनात तेव्हा, काळजाचा तुकडा कर्तव्यासाठी असा बाजूला काढून ठेवायचा आणि निघून जायचं.
ऑफिसमध्ये येत्या ‘फादर्स डे’ निमित्त सोशल मीडियासाठी काही क्रिएटिव्ह करण्याची तयारी सुरु होती आणि मग या प्रसंगाची आठवण झाली.
बाप – एक व्यक्ती, घरात ज्याची जरब असते, तो घरी आला कि घरात सगळीकडे शांतता.
आईसारखी त्याला माया नसते, तो निर्णय घेताना मनाने विचार नसतो करीत, जे बरोबर आहे ते सर्व माया बाजूला सारून निर्णय घेणारा.
आमच्या पिढीपर्यंतचे “बाप” हे बऱ्याचपैकी असेच असायचे. आमचे पप्पा थोडे फ्रेंडली आहेत त्यामानाने.
बापाची एक वेगळीच प्रतिमा निर्माण झालेली आहे आणि चित्रपट, सिनेमा यांनी त्याला एका साच्यात बसवलेलं आहे, वरती सांगितल्याप्रमाणे.
आपण बऱ्याचदा ऐकलं आहे, ठेच लागली कि “आई गं” तोंडातून नकळत निघते आणि एखादा भरधाव ट्रक अचानक जवळून निघून गेला कि “बाप रे”, तोंडात येतं.
काहीतरी आव्हानात्मक आलं कि बाप आठवतो. कारण आपल्याला लहानपणापासून सवय झालेली असते, आणि आईही सांगत असते, “बाबा आहेत ना, नको काळजी करुस”, किती धीर येतो तेव्हा.
आई आणि बापाच्या प्रेमाची नेहमीच तुलना होत असते, आई जवळ घेऊन मुका घेते, लेकराला थोडं काही झालं कि तिला धस्स होतं, लेकरं घरापासून दूर जाताना नकळत तिचा पदर डोळ्याकडे जातो, ते सारं दिसते.
बापाचंही अगदी तसंच होत असते, पण तो दाखवत नाही. का? कारण बाप तसाच असतो.
आईचं प्रेम दिसतं, बापाची माया फक्त अनुभवता येते. जसा वारा, वाऱ्याची झुळूक अनुभवता येते, तसंच बापाची माया, प्रेम हे फक्त अनुभवता येते.
मुलाचं काही चुकलं कि, आई “पुन्हा नाही करणार तो”, म्हणून त्याला पदराखाली घेते, तर बाप, “व्हय घराच्या भायेर” म्हणून घरातून हाकलायला तयार असतो. त्यालासुद्धा तसं म्हणताना दुःखच होत असतं, पण त्याला वाटत असते, एक चूक माफ केली तर पोरगं बिघडेल.
बापाची माया लेकीबाळींवर जास्त असते, असेलही कदाचित. पोरगी सासरला जाताना हमसून हमसून रडणारा बाप, पोरगा शिकायला बाहेरगावी जात असताना, “जास्त पैशे लागले तर सांग, काळजी करू नको” असं सांगतानाचा तो कापरा आवाज, त्या बोलण्याला रडण्याच्या ‘पोचपावतीची’ गरज नसते, ते त्या मुलाला आणि बापालाही समजत असते.
फक्त अशा न व्यक्त करता येणाऱ्या प्रेमामुळे कदाचित बापाच्या प्रेमाला अपेक्षित अशी जागा मिळाली नसेल.
म्हणूनच “श्यामची आई”, आपल्या सर्वांना माहीत आहे, पण “कुणाचेतरी बाबा” असं क्वचितच वाचायला मिळतं.
आजच्या पिढीतले बाप हे “आमचे बाबा’ पासून “माझा बाबा” अशा एकेरीवर आला आहे. त्याच्यासोबतचे धोरण आता थोडंफार सौम्य झालं आहे. पण तरीही शेवट करताना “बापल्योक” या मराठी चित्रपटातील बापावरच्या गाण्याने या लेखाचा समारोप करावासा वाटतोय –
उरामंदीं माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुना डोळ्यातलं पाणी
झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, व्हटामंदी हासू जरी, कना वाकला
घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धाप रं, लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रं


Leave a comment