तु नेहमी म्हणायचीस, “तु बोलत नाहीस, का बोलत नाहीस? असा कसा रे तु?”
कधी कधी तुला माझा रागही यायचा. पण मग तूच सावरून घ्यायचीस, ‘प्रत्येकाचा एक स्वभाव असतोच ना’ असे म्हणत.
ते म्हणतात ना, दोन विरुद्ध ध्रुव एकत्र येतात. तसंच तुझा खळखळणाऱ्या ओढ्यासारखा बोलका स्वभाव आणि त्याला तितक्याच शांततेने साथ देणारा प्रवाह — मी.
तु बोलायचीस, मी ऐकायचो. हा एकतर्फी संवादच तर होता, जो आपल्याला जोडत होता. मग उगाचच मी बोलून त्यात का खोडा घालायचा?
पण एक गोष्ट मी कधीच तुला सांगितली नाही, तू बोलताना, तुझ्या सोबत असताना, मी खरंतर कधीच नि:शब्द नव्हतो. तुझ्याशी माझ्या मनाचा एक अव्यक्त संवाद नेहमीच सुरू असायचा.
तुझा प्रत्येक शब्द, त्या शब्दांबरोबर तुझ्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावांना, आणि नकळत होणाऱ्या स्पर्शांना माझं मन अगदी मनमुरादपणे प्रतिसाद द्यायचं.
फक्त तुझ्याशीच नाही, तुझ्या येण्याआधीच वाऱ्याची झुळूक, तुझ्या सहवासात दरवळणारा गंध, आणि तु गेल्यावर मागे राहणारी तुझी आठवण — या सगळ्यांशी मी नकळत बोलत रहायचो.
हे माझे मूक स्वर, कधी गडगडणाऱ्या ढगासारखे जाणवायचे, तर कधी खोल खोल मनात गुंतून जायचे. आणि मग परत लक्ष द्यायचो तुझ्या बोलण्याकडे. तुझे ते मधुर शब्द कानावर पडले की, मनातला तो संवाद पुन्हा नकळत सुरू व्हायचा.
“चल, येते… पुन्हा भेटू, बाय!” असं म्हणत तू निघून जायचीस. आणि तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने मी निःशब्द व्हायचो.
का कुणास ठाऊक, इतक्या वर्षांनंतरही हा संवाद तसाच अव्याहत सुरू आहे. मनातला एक कोपरा काबीज केल्यासारखा प्रत्येक क्षणी तुझ्याशी बोलत राहतो — तू नसताना सुद्धा.
आज पुन्हा भेटलीस तू. पण…पण अजूनही व्यक्त होणं तितकंच कठीण वाटत होतं. शब्द अगदी त्या कुठलीतरी नदी अचानक पृथ्वीत गुडूप झाल्यासारखे गुडूप झाले होते.
पाण्यात बुडणाऱ्या त्या व्यक्तीसारखं माझं मनही हात उंचावून ‘स्वतःला वाचव’ असा धावा करत होतं, तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतं, पण ते शब्द पृष्ठभागावर कधी आलेच नाहीत.
खरं सांग, हा अव्यक्तपणाच मला दूर घेऊन गेला का तुझ्यापासनं? खरंच मला व्यक्त व्हायला हवं होतं का? पण तुला तर माहित आहे, तो माझा स्वभाव नाही. माझा हा अव्यक्तपणाच आपल्यामधला गूढ धागा असताना, तुला तरी अशी अपेक्षा का होती?
आता सावरतोय मी स्वतःला… आधार घेतोय त्या असंख्य क्षणांचा, जे तुझ्या सोबत घालवले.
करेन का शेवटचा प्रयत्न व्यक्त होण्याचा — तुझ्यासमोर, एकदा तरी.


Leave a comment