
चार लहानपणीचे मित्र होते, एकत्र खेळलेले, वाढलेले. एकच शाळा, नंतर कॉलेज. अगदी जिवलग असे. त्यांच्या सुदैवाने मोठे झाल्यावरही ते एकाच शहरात राहू लागले. त्यातील एकजण डॉक्टर, दोघे बिझनेस मध्ये गेले आणि एकजण जॉब करू लागला.
मोठी झाल्यावर सर्वांची लग्नं उरकली व काही काळाने अपत्येही झाली. पण लग्नं झाल्यावरही त्यांच्यातील मैत्री तसूभरही कमी झाली नाही, उलट वाढलेल्या परिवारामुळे ती अधिकच बहरली.
वीकेण्डला भेटणे, मस्ती करणे, सणावाराला एकत्र येणे, अगदी दृष्ट लागण्यासारखं होतं सर्व काही.
एकदा त्यांनी बाहेरगावी पिकनिक प्लॅन केली आणि निघालेही. ट्रेनचा प्रवास होता. छान हसत खेळात प्रवास सुरु होता. ट्रेन अचानक एका भुयारात शिरली. पण ट्रेन बाहेर आल्यावर दृष्ट लागू न शकणाऱ्या मैत्रीला मात्र दृष्ट लागलीच.
त्या भुयारातील ५-१० क्षणात सर्वांनी काही आवाज ऐकले, एक चुंबनाचा आणि एक चापटीचा. या गोष्टीने सर्वच जण अवाक झाले. एवढ्या वर्षांच्या सहवासानंतर हे असं काही अनपेक्षित होतं. कुणीच कुणाला काही बोललं नाही पण हि शांतता बरंच काही सांगून गेली.
झालं, ती पिकनिक मग फक्त नावादेखील झाली. परत आल्यावर ती शांतता दुराव्यात बदलली. सर्व काही बदललं होतं.
अधनंमधनं एखाद दोन जोडपे भेटायचे, पण बोलण्याचा विषय त्या “चुम्बन आणि चापट” या भोवतीच फिरायचा. काही तरी जुन्या गोष्टी आठवून, “हा तो किंवा तीच असेल, मागे नाही का तोच असे काही बोलत होता”, अशा त्यावेळेस मजेमध्ये केलेल्या गोष्टीला आता सिरिअस आणि संशयास्पदरित्या पाहणं सुरु झालं.
एवढंच काय, जी दोन जोडपी बोलत, त्या दोघांना देखील एकमेकांवर विश्वास नव्हता.
एवढ्या वर्षांचा सहवास, जिवाभावाची मैत्री, पण कुणालाही वाटलं नाही कि सर्वजण मिळून याचा खुलासा करावा. विशेष म्हणजे ज्या गोष्टी आता आठवून संशय घेतल्या जात होता, त्या गोष्टींचं तेव्हाच का निरसन झालं नाही किंवा केलं नाही. अशा गोष्टी क्लीअर करण्यासाठी काही घटना घडणेच आवश्यक असते का. आणि मग असं काही घडल्यावर जे थोडं फार ताणलेले असते ते फाटतच जाते, पुन्हा कधीही भरून न निघण्यासारखं.
हे झालं एका गोष्टीतील, पण आपल्या आयुष्यात देखील असंच घडत असतं.
एखादी गोष्ट मनात ठेवायची आणि काही अघटित घडलं कि जुन्या गोष्टी उगाळत बसायचं. कुणी दुखावल्या जाणं, कुणाचा नकळत अपमान होणे, नकळत झालेली चूक, मानापमानाच्या गोष्टी, या तिथल्या तिथे बोलून सोक्ष मोक्ष लावून टाकलं कि असं काही घडल्यावर गैरसमज आणि विशेषतः मनस्ताप होत नाही.
पण सहसा हे होत नाही, मग आपल्यातील कुणाचं जगातून जाणं, वेगळं होणं, या गोष्टी घडतात. मग सर्वजण तुटून पडतात एकमेकांवर. यामुळे दुरावा निर्माण झालेल्या दोन्ही पक्षांना दुःखच होतं, कारण कधी काळी त्यांनी एकमेकांना जीवापाड प्रेम, माया दिलेली असते.
का वाट बघायची असं काही होण्याची, का नाही मनातलं मळभ दूर करायचं, अहंकार, अभिमान, मीपणा बाजूला सारून. पण असं क्वचितच होतं.
आता परत त्या गोष्टीकडे येतो. शेवटी काही दिवसांनी तो डॉक्टर मित्र सर्वांना बोलावून खुलासा करतो कि, तो चुंबन आणि चापटीचा आवाज त्याने स्वतःच काढलेला असतो. हे ऐकून सर्व मित्र हैराण होतात. परंतु एव्हाना पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं असतं आणि काहीकेल्या परिस्थिती पहिल्यासारखी होणार नसते.
हि एक गोष्ट होती, पण आपण आपल्या आयुष्यात तो भुयारातील अंधारच येऊ न देण्याचा प्रयत्न करायचा, कसोशीनं, जिद्दीनं.

Leave a reply to Emotionsbyvijay.com Cancel reply